श्रीरामपूर-
सांघिक खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये एकोपा वाढतो तसेच सर्व जात, धर्म, पंथ, व भाषा विसरून सर्वजण खेळ या एकाच भाषेद्वारे एकत्र येतात. पराभूत झाल्यानंतर आयुष्यात पुन्हा उभे राहण्याची व नव्या उत्साहाने आव्हानांना सामोरे जाण्याची प्रेरणा ही खेळाद्वारे मिळते, असे प्रतिपादन अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.अशोक सहकारी साखर कारखाना संचलित माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली व सौ.मंजुश्री मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अशोक आयडियल या सीबीएसई संलग्न स्कूलमध्ये तालुकास्तरीय आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचा उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला. सदर स्पर्धा ही श्रीरामपूर तालुका क्रीडा संघटना व अशोक आयडियल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. यावेळी केलेल्या अध्यक्षीय भाषणात भानुदास मुरकुटे बोलत होते.अशोक आयडियल स्कूल मध्ये विविध खेळाद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविला जातो असे यावेळी अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांनी नमूद केले. श्रीरामपूर तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष काकासाहेब चौधरी तसेच उपाध्यक्ष नितीन तमनर यांनी स्पर्धेकरिता उपलब्ध सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले. या स्पर्धेमध्ये वय वर्षे १४, १७ व १९ खालील वयोगटांमध्ये मुले व मुली यांचे प्रत्येकी ३२ संघ सहभागी होते.
पाहुण्यांचा सत्कार प्राचार्य रईस शेख यांनी केला याप्रसंगी अशोक सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन बाबासाहेब आदिक, सौ.मंजुश्री मुरकुटे, अशोक कारखान्याचे संचालक निरज मुरकुटे, रामभाऊ कसार, ॲड्.सुभाष चौधरी, अशोक पॉलिटेक्निकचे प्राचार्य अंजाबापू शिंदे तसेच इतरही अनेक क्रीडा शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावणी काळे व अनुष्का कुंदे यांनी केले तर आभार तनिषा बारसे हिने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक राजू दुधाने सुनील बागुल युसुफ सय्यद यांनी परिश्रम घेतले.
