श्रीरामपूर-
टाकळीभान हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे व परीसरातील खेड्यांचे दळणवळण येथुनच होत आसल्याने या ठिकाणी बस थांब्यासाठी बसस्टॅंड आवश्यक आहे. मात्र या ठिकाणी बस स्टॅंडच नसल्याने प्रवाशांना, महीलांना व विद्यार्थी विद्यार्थ्रिनींना उन, वारा, पावसात रस्त्याच्या कडेलाच ताटकळत उभे राहावे लागते.त्यामुळे येथील तरूणांनी सार्वजनीक बांधकाम विभागाकडे बस स्टॅंड व सुलभ शौचालय बांधण्याबाबतचे निवेदन दिले असून यात रास्तारोकोचा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनात नमूद केले आहे की, टाकळीभान हे गाव तालुक्यातील मोठे गाव आहे. या गावातून तसेच पंचक्रोशीतील अनेक गावातून ग्रामस्थ तसेच शालेय विद्यार्थी शिक्षण, नोकरी तसेच इतर दैनंदीन कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी जातात. स्टॅंडवर आल्यानंतर बस येईपर्यंत या प्रवाशांना तसेच विद्यार्थ्यांना बस स्टॅंड नसल्यामुळे रस्त्याच्या कडेलाच तासनतास ताटकळत उभे राहावे लागते. या ठिकाणी बस स्टॅंड होते. मात्र रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली हे बस स्टॅंड रस्ता रुंदिकरणाला आडथळा ठरत नसतानाही पाडले गेले आहे. तसेच या ठिकाणी बस स्टॅंड साठी निधी मंजुर आहे. माञ निधी मंजूर असतानाही अधिकार्यांच्या चालढकलीमुळे ते होवू शकले नाही.
टाकळीभानचा परिसर विस्तीर्ण असल्याने गावातील लोकसंख्या व विद्यार्थी संख्या प्रचंड वाढलेली आहे. रस्त्याच्या दुर्तफा हे विद्यार्थी बसची वाट पाहत उभे असतात. महिला व विद्यार्थीनींची यावेळी प्रचंड हेळसांड होत आहे. तरी सा. बां. विभागाने लवकरात लवकर या ठिकाणी बस स्टॅंड व सुलभ शौचालय बांधावे, अन्यथा टाकळीभानचे संतप्त ग्रामस्थ व विद्यार्थी रास्तारोको आंदोलन करणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या निवेदनावर काकासाहेब कोकणे, सचिन माने, विकास पटारे, साईनाथ खंडागळे, भाऊसाहेब पवार, बद्रीनाथ पटारे आदींच्या सह्या आहे.
