श्रीरामपूर-
श्रीरामपूर नगरपालिकेने काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर शहरातील ७२२ गाळेधारकांना ७५ टक्के भाडेवाढ करण्याची नोटीस बजावली होती. तेव्हा पासून गाळेधारकांमध्ये प्रचंड चिंता आणि रोष होता. मध्यंतरी कोरोनाच्या साथीनंतर श्रीरामपूर शहरातील गाळेधारकांच्या व्यवसायावर परिणाम झाला. त्यामुळे आर्थिक उलाढाल कमी झाली. त्यानंतर आता व्यावसायिक हळूहळू आपला व्यवसाय सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यात हि भाडेवाढ अन्यायकारक आहे,म्हणून गाळेधारकांमध्ये अस्वस्थता होती.
सदर गाळेधारकांनी माजी नगराध्यक्ष संजय फंड यांना भेटून भाडेवाढ करू नये म्हणून विनंती केली होती. म्हणून संजय फंड यांनी काही गाळाधारक यांचे शिष्टमंडळ घेऊन मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची भेट घेतली व आपली व्यथा मांडली.मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी गाळेधारकांची व्यथा ऐकून घेत राज्याचे जलसंपदा, कृष्णा व गोदावरी खोरे मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करून नामदार विखे पाटील यांच्या मार्फत श्रीरामपूर नगरपालिका मुख्याधिकारी यांना सध्या अशी कुठलीही भाडेवाढ करू नये अशा सूचना केल्या.तसेच सदर भाडेवाढ स्थगितीबाबत शासनस्तरावर प्रस्ताव पाठवण्यास सांगितले असून शासनाचे आदेश होई पर्यंत कुठलेही भाडेवाढ करू नये अशा सूचना देण्यात आल्या. या कामी माजी नगराध्यक्ष संजय फंड, आशिष धनवटे, जितेंद्र छाजेड, सोमनाथ गांगड, संजय गांगड, सागर भागवत, अमोल शेटे व सर्व गाळेधारक उपस्थित होते.
