श्रीरामपूर-
जिल्ह्यात भाजप पक्षाची घडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी व्यवस्थित बसवली आहे.दक्षिणेतून विधानपरीषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उत्तरेत आमदार सत्यजित तांबे आणि आमदार विवेक कोल्हे यांना पक्षाने योग्य संधी दिली असून मा. खा.डॉ. सुजय विखे यांच्या बाबत विनाकारण काही लोक अशा वावड्या का उठवतात? हे आपल्याला समजत नाही, अशा शब्दात राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली.दरम्यान,आमदार विवेक कोल्हे यांनी केलेल्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, विखे कुटुंबाला नेहमीच टोकाचा विरोध सहन करावा लागलेला आहे. राजकारणात टीका ही होतच असते,परंतु पक्षात कोणतेही मतभेद नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वांशी उत्तम संवाद ठेवून निर्णय घेत असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री विखे पाटील हे बोलत होते.आ. विवेक कोल्हे यांनी केलेल्या टिकेवर आणि विधानपरिषद उमेदवारी बाबत सुजय विखे यांच्या नावाच्या चर्चेबद्दल त्यांना पत्रकारांनी छेडले असता त्यांनी आपले मत व्यक्त केले.मंत्री विखे पाटील पुढे म्हणाले की, डॉ. सुजय विखे यांनी विधानपरिषदेच्या उमेदवारीबाबत उमेदवारी अर्ज भरलेला नाही किंवा त्यांनी तशी कुठल्याही प्रकारची पक्षकडे मागणीही केली नाही.सुजय विखेंच्या नावाची शिफारस पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये करण्यात देखील आलेली नाही,तरीही विनाकारण काही लोक अशा वावड्या उठवत असून सुजय विखे यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न का केला जातो आहे, हे समजायला मार्ग नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात पक्षाची घडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी व्यवस्थित बसवली असल्याचेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.
