श्रीरामपूर-
वडाळा महादेव येथील अजितदादा पवार पॉलिटेक्निक कॉलेजच्या बसच्या श्रीरामपूर शहरात काचा फोडून तोडफोड करत दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींना शहर पोलिसांनी जेरबंद केले होते.या आरोपींना पोलिसांनी घटना घडलेल्या ठिकाणी पायी नेऊन पंचनामा करत त्यांची दहशत मोडून काढली.या कारवाईत पोलिसांनी परवेज जमीर शेख (वय २२, रा. जुना अशोक पेट्रोल पंप समोर, नेवासा रोड, वॉर्ड क्रमांक ६, श्रीरामपूर), सलमान हसन पठाण (वय २४, रा. भारत गॅस समोर, नेवासा रोड, वॉर्ड क्रमांक ६, श्रीरामपूर), अल्ताफ हनीफ सय्यद (वय २५, रा. अलका हॉस्पिटलजवळ, वॉर्ड क्रमांक ३, श्रीरामपूर) आणि देविदास राजू शिंदे (वय २१, रा. कानिफनाथ नगर, दिवी रोड, श्रीरामपूर) या चौघांना अटक केली आहे.बसने कट मारल्याच्या कारणावरून आरोपींनी सदर कॉलेजच्या बसच्या काचा फोडून तोडफोड केली होती. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर शहर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांना घटनास्थळी नेऊन प्रत्यक्ष पंचनामा केला.पोलिसांच्या या कारवाईमुळे भाईगिरी करणाऱ्या प्रवृत्तीला नक्कीच चाप बसण्यास मदत होईल अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
