श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या गोळीबाराच्या हल्ल्यात सुदैवाने कहाणे हे बचावले असून या हल्ल्यामुळे संपूर्ण श्रीरामपूरसह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. श्रीरामपूर शहरातील वाढती गुन्हेगारी पोलीस यंत्रणेपुढे आव्हान निर्माण करत आहे. सध्या शहरात प्रचंड तणावाचे वातावरण असून ही घटना पूर्ववैमनस्यतुन घडली की अन्य एखाद्या विशिष्ट कारणावरून याबाबत पोलीस तपास करत आहेत.
८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास शिवसेना नेते प्रशांत कहाणे हे त्यांच्या चारचाकी गाडीतून जात होते. त्याचवेळी गोंधवणी परिसरात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीच्या दिशेने थेट गोळीबार केला. चालत्या गाडीवर अचानक गोळ्या झाडल्या गेल्याने परिसरात एकच घबराट पसरली. सुदैवाने हल्लेखोरांचा नेम चुकल्याने एक मोठी दुर्घटना टळली. प्रशांत कहाणे या जीवघेण्या हल्ल्यातून थोडक्यात आणि सुखरूप बचावले आहेत.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हल्लेखोरांचा कसून तपास सुरू केला आहे. सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, गोळीबार करून पळून गेलेल्या अज्ञात हल्लेखोरांसह त्यांच्या दुचाकीचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
