श्रीरामपूर-
उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन प्रवरा डाव्या व उजव्या कालव्यातून सिंचन तसेच बिगर सिंचनाचे दुसरे एकत्रित आवर्तन तातडीने सोडण्यात येणार आहे. नदीकाठच्या गावांना मोठा दिलासा देणारे हे आवर्तन सोडण्याचे निर्देश जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत.सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने बहुतांश गावांतील पाण्याचे स्रोत आटले आहेत. शेतीसह पाणीपुरवठा योजनांना पाणी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासह जनावरांसाठी पाणी मिळावे, अशी शेतकरी व नदीकाठच्या गावांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत होती.प्रवरा नगर येथे आयोजित जनता दरबाराच्या माध्यमातून आमदार अमोल खताळ यांच्यासह शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने या प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली होती.या विनंतीची दखल घेत धरणातील पाण्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला व त्यानंतर हे एकत्रित आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला. सुरू होणाऱ्या या आवर्तनातून पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
